Sangli News : सांगलीच्या म्हैसाळ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. विजेचा शॉक लागून बाप-लेकासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एक जण जखमी झाला आहे. मृतांमध्ये एका 13 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. परिशनाथ व्हनमोरे (वय 40), साईराज व्हनमोरे (13) आणि प्रदीप व्हनमोरे (35) अशी मृतांची नावे आहेत. तर हेमंत पारिशनाथ व्हनमोरे (वय 14) असे जखमी मुलाचे नाव आहे. म्हैसाळमध्ये राहणारे व्हनमोरे कुटुंबातील वडील, भाऊ आणि दोन मुले असे चौघेजण त्यांच्या सुतारमळा येथे असणाऱ्या शेतामध्ये सकाळी वैरण काढण्यासाठी गेले होते. शेतात वैरण काढत असताना शेतात पडलेल्या वीज वितरण कंपनीच्या विद्युत तारेचा त्यांचा स्पर्श झाला. यामध्ये वडील आणि काका विजेचा शॉक लागल्याने खाली पडले. वडील आणि काका खाली पडले हे पाहायला गेलेल्या मुलांना देखील विजेचा शॉक लागला. यामध्ये यामध्ये तिघेजण ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर या घटनेप्रकरणी वीज वितरण कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी करण्यात येत आहे.