बलात्काराच्या आरोपावरून पिता-पुत्राला 20 वर्षाची शिक्षा

कोटा – एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून एक 24 वर्षाचा मुलगा आणि त्याचे वडिल अशा दोघांनाहीं येथील पोस्को न्यायालयाने 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तीन वर्षांपुर्वीची ही घटना असून आरोपी हा पीडितेचा चुलत भाऊ आहे. या गुन्हात त्याला त्याच्या 56 वर्षीय वडिलांनी मदत केली. त्यामुळे दोघांनाही ही 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून त्यांना प्रत्येकी 30 हजार आणि 20 हजार रूपये दंडही ठोठावण्यात आला आहे.
आरोपीने 13 जानेवारी 2019 रोजी कोटा येथील बुधाडेत पोलीस स्टेशन हद्दीतून अल्पवयीन चुलत बहिणीचे तिच्या घरातून अपहरण केले. त्याने मुलीला चित्तोड जिल्ह्यातील त्याच्या वडिलांच्या निवासस्थानी नेले आणि त्याने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. या प्रकरणात आरोपीच्या वडिलांनी त्याला पुर्ण मदत केली. इकडे तिच्या अपहरणानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी एका महिन्यानंतर अल्पवयीन मुलीची सुटका केली आणि तिच्या वक्तव्याच्या आधारे, पितापुत्राच्या विरोधात गुन्हा दाखल केला.





