Crime News : दारूच्या नशेत बाप-लेकात वाद; झटापटीत वडिलांचा मृत्यू, गुन्हा दाखल
Crime News : गावातील महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी उमदी पोलिस ठाण्याकडे अनेक वेळा तक्रारी व निवेदने दिली होती. मात्र संबंधित धंदे अद्यापही सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

सांगली : जत तालुक्यातील लकडेवाडी येथे गुरुवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेत दारूच्या नशेत झालेल्या बाप- लेकातील वादाचे रूपांतर दुर्दैवी घटनेत झाले. झटापटीदरम्यान गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून गावात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खंडू श्रीमंत भिसे (वय ४६, व्यवसाय – शेती) हे त्यांचा मुलगा सोन्या उर्फ पृथ्वीराज खंडू भिसे (वय २२) याच्यासोबत घरी होते. दोघांनीही मद्यप्राशन केले होते. किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद पुढे हाणामारीत परिवर्तित झाला. झटापटीदरम्यान खंडू भिसे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हलविण्यापूर्वीच त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर लकडेवाडी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू असून त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. दारूच्या व्यसनामुळे गावातील तरुण पिढी भरकटत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, गावातील महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी उमदी पोलिस ठाण्याकडे अनेक वेळा तक्रारी व निवेदने दिली होती. मात्र संबंधित धंदे अद्यापही सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना माजी सरपंच बंडगर यांनी पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.“अवैध दारू विक्रीमुळे एका कुटुंबाचा आधार हरपला आहे. गावातील अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. तरीही हे धंदे सुरूच कसे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या घटनेमुळे लकडेवाडी गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी गावकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.





