मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून वडिलांचाही दुर्दैवी अंत; सावंतवाडीतील हृदयद्रावक घटना

सावंतवाडी : शहरात एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. १८ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या वडिलांचेही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. या घटनेमुळे संभया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, यामुळे शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रिश संभया (१८, रा. सालईवाडा, सावंतवाडी) हा तरुण मंगळवारी, ३ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास कारीवडे येथील धरणावर फोटो काढायला गेला होता. यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो नदीत पडला. पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे.
या घटनेनंतर बाबल आल्मेडा रेस्क्यू टीमच्या सहाय्याने क्रिशचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र अखेर मंगळवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. क्रिशच्या निधनाची बातमी त्याचे वडील सेव्हिओ संभया (४८) यांना समजताच त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. क्रिश हा त्यांचा अत्यंत लाडका मुलगा असल्याने त्याच्या अचानक जाण्याने त्यांना असह्य दुःख झाले. याच धक्क्याने आज बुधवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.





