राजगुरुनगर : खेड तालुक्यातील रेटवडी येथे जुन्या वादातून बुधवारी (दि. 20) रात्री हॉटेल परिसरात मोठा थरार घडला. एका गटाने हॉटेलच्या पार्किंगमध्ये येऊन एका तरुणावर लाकडी दांडके, कोयता आणि विळ्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. तसेच हायवा वाहनाने चार चारचाकी वाहनांना धडक देत मोठी तोडफोड केल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात अमोल काळे हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी प्रमोद रघुनाथ हिंगे (वय 28, रा. रेटवडी, सातारकावस्ती) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अशोक कान्दू रेटवडे, दर्शन मच्छिंद्र काळे, संकेत कांताराम दुबे, प्रणव नवनाथ पवळे (सर्व रा. रेटवडी), प्रविण प्रकाश रामाणे (रा. दावडी, ता. खेड) तसेच इतर तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास रेटवडी गावातील एका हॉटेलच्या शेड व पार्किंग परिसरात फिर्यादी व त्यांचे सहकारी बसले होते. त्यावेळी आरोपी टाटा हायवा व निळ्या रंगाच्या इंट्रा वाहनातून तेथे आले. तू गोरख म्हसाडे विरोधात तक्रार का दिली? असा जाब विचारत आरोपींनी अमोल काळे यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू करण्यात आली. फिर्यादीनुसार, अशोक रेटवडे व प्रविण रामाणे यांनी इंट्रा वाहनातून लाकडी दांडके आणून अमोल काळे यांच्या डोक्यावर, पाठीवर व पायावर मारहाण केली. यानंतर दर्शन काळे व संकेत दुबे यांनी हायवा वाहन चालवत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. यात फिर्यादी प्रमोद हिंगे यांची स्विफ्ट, वैभव वाबळे यांची टाटा हॅरिअर, अमोल काळे यांची वेरणा आणि किरण पवार यांच्या आय-20 या वाहनांचे मोठे नुकसान झाले. फिर्यादीनुसार, आरोपींनी अमोल काळे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हायवा अंगावर घालण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर कोयता व विळ्याने त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आले. या हल्ल्यात अमोल काळे गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळल्याचे नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित काही अनोळखी व्यक्तींनीही मारहाणीत सहभाग घेतल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच गोरख म्हसाडे आला तर अशीच अवस्था करू, अशी धमकी देत आरोपींनी वाहनांवर दगडफेक करून नुकसान केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. रेटवडी येथील हल्ल्याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुरूम काढण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. खेड सेझ परिसरातील गुन्ह्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष असून तातडीने कारवाई केली जात आहे. अवैध मुरूम व माती वाहतूक करणार्या क्रमांकफलक नसलेल्या हायवा वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच ठेकेदारीच्या वादातून औद्योगिक परिसरात घडणारे गुन्हे रोखण्यासाठीही पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. -अमोल मांडवे, पोलीस उपाधीक्षक, खेड हेही वाचा : Pune District : खरीपसाठी राज्य सज्ज : भरणे; दर्जेदार बियाणे-खतांचा वेळेत पुरवठा होणार