Pune District : खरीपसाठी राज्य सज्ज : भरणे; दर्जेदार बियाणे-खतांचा वेळेत पुरवठा होणार
Pune District : सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम २०२६ संदर्भातील राज्यस्तरीय नियोजन बैठक पार पडली.

इंदापूर : राज्यातील २०२६ चा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासनाने व्यापक पूर्वतयारी केली असून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि अन्य कृषी निविष्ठांचा वेळेत पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम २०२६ संदर्भातील राज्यस्तरीय नियोजन बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
राज्यात खरीप हंगामात सरासरी १४५ लाख हेक्टर क्षेत्रावर तर रब्बी हंगामात सुमारे ५० लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. सोयाबीन, कापूस, मका, भात, तुर, मुग आणि उडिद ही राज्यातील खरीपातील प्रमुख पिके असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले.
कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले की, कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन केले आहे. जिल्हानिहाय पालकमंत्री तसेच तालुकानिहाय आमदारांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठका घेण्यात आल्या असून खते, बियाणे आणि अन्य निविष्ठांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. निविष्ठा उत्पादक कंपन्यांनीही सक्रिय सहभाग घेतल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण साहित्य उपलब्ध होणार आहे.
राज्यातील शेतकरी संकटांशी झुंज देत प्रचंड मेहनत करत असतात. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग आणि संलग्न यंत्रणांच्या समन्वयातून यंदाचा खरीप हंगाम निश्चितपणे यशस्वी ठरेल.
– दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री.
हेही वाचा : Pune News : दैनिक प्रभातचे छायाचित्रकार ‘संदीप घोडके’ यांचे निधन





