परभणी वसमत महामार्गावर भीषण अपघात; पती पत्नीसह 11 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यु

शिवशंकर निरगुडे
हिंगोली : परभणी वसमत रोडवरील असोला शिवारातील डॉ. नावंदर फार्म हाऊस जवळ ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी येथील आई-वडिलांसह मुलगा हे तीन जण जागीच ठार झाल्याची घटना रविवार १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास घडली.
समोर आलेल्या माहितीनुसार, औंढा तालुक्यातील अंजनवाडी येथील कुटुंब परभणी येथून परभणी- वसमत रस्त्यावरून एम.एच.३८ – ए.सी.८३७१ सदरील क्रमांकाची दुचाकी परभणी येथून परभणी वसमत रोड मार्गे झिरो फाटाकडे जात होती.
त्यादरम्यान परभणी वसमत रोडवरील असोला शिवारातील डॉ नावंदर फार्म हाऊस जवळ झिरो फाटा मार्गे परभणी कडे जात असलेल्या ट्रॅक्टरची धडक बसल्याने अपघातात दुचाकीवरील एकनाथ बाबाराव घुगे (३६), शुभांगी एकनाथ घुगे (३४), समर्थ एकनाथ घुगे (११) हे तीन जण जागीच ठार झाले.
परभणी- वसमत रोडवरील प्रवास करणाऱ्या नागरिकांसह शेतकऱ्यांनी सदरील घटनेची माहिती पोलिसांना दिली. मात्र या घटनेबाबत ताडकळस पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, एकनाथ घुगे हे रिसोड आगारामध्ये वाहक पदावर कार्यरत होते. मनमिळावू स्वभावाच्या एकनाथचा अपघातात पत्नी व मुलासह मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडल्याने अंजनवाडी गावावर शोककळा पसरली. मयत एकनाथ शिंदे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे. एकनाथचा भाऊ नवनाथ घुगे हे सुद्धा हिंगोली आगारामध्ये वाहक पदावर कार्यरत आहेत.





