मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; 11 जण जखमी

पुणे : पुणे- मुंबई एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री 3 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. बसला टेम्पो ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या धडकेनंतर बस रस्त्याकडेला 20 फूट खोल खड्ड्यात पलटी झाली. या बसमधून 11 प्रवासी प्रवास करत होते. त्यातील 3 जण गंभीर झाले आहेत. त्यांना तातडीने पनवेलच्या महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कसा घडला अपघात?
पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगतीवर खंडाळा बोरघाटात मध्यरात्री तीनच्या सुमारास हा अपघात झाला. सांगोला ते मुंबई ही खाजगी बस निघाली होती. तेव्हा कोंबड्या वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा ब्रेक फेल झाला. यानंतर टेम्पोने खासगी बसला मागून जोराची धडक दिली. यामुळे बस चालकाचा बसवरील ताबा सुटून प्रवासी बस थेट एक्स्प्रेसवरील सुरक्षित रोलिंग तोडून 20 फूट खड्ड्यात पलटी झाली.
या अपघाताची माहिती मिळताच आयआरबी देवदूत पथक ,खोपोली अपघातग्रस्तांना मदत करणारी टीम आणि महामार्ग पोलीस दाखल झाले. त्यांनी बस मधील अडकलेल्या बस चालकांसह प्रवाशांना सुखरूपणे बाहेर काढलं. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.





