nagar | इमामपूर घाटात कंटेनरचा भीषण अपघात ; एक जण ठार!

नगर, (प्रतिनिधी) – छत्रपती संभाजीनगर महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून इमामपूर घाटात मंगळवार (दि. १८) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कंटेनरच्या अपघातात वडील ठार तर मुलगी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
इमामपूर घाटाच्या तीव्र उताराने छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाचे (क्र. एन. एल. ०१ ए. एफ. ४६६९) वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरचा अपघात घडला. कंटेनरने प्रथम नगरकडे येणाऱ्या इंट्रा मालवाहतूक ( क्र. एम.एच. १२ डब्ल्यू. एक्स. ००७९) वाहनाला जोराची धडक दिली.
यामध्ये मालवाहतूक गाडी महामार्गा लगत पलटी झाली. त्याच वेळी समोरून येणाऱ्या दुचाकीस ( क्र. एम. एच. १२ एम. जी. ५४२९) कंटेनरने जोराची धडक दिली.
अपघातामध्ये दुचाकी वरील अनिल दगडू फाटके ( वय ५२ रा. खरवंडी, ता. नेवासा) हे मयत झाले आहेत. तर त्यांची मुलगी दिपाली अनिल फाटके ( वय २०) गंभीर रित्या जखमी झाली आहे.
तिच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर कडे जाणाऱ्या कंटेनरमध्ये डांबरने भरलेली टिपाडे होती. अपघातानंतर कंटेनर पलटी झाल्याने महामार्गावर सर्वत्र डांबराची टिपाडे पसरली होती.
त्यातील डांबरही महामार्गावर पसरला गेला होता. कंटेनर महामार्गावरच आडवा झाल्याने संपूर्ण वाहतूक खोळंबली होती. सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर दोन क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर बाजूला घेण्यात पोलिसांना यश आले.
त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा सुमारे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक वाहनचालक डोंगरगणमार्गे वाहने घेऊन जात होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी एमआयडीसी पोलीस व महामार्ग पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
अपघातातील मयत अनिल फाटके आपल्या मुलीच्या शाळेतील प्रवेशासाठी नगरला येत असल्याची माहिती समजली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व अपघातात जखमी झालेली मुलगी आहे. अनिल फाटके हे शेती व दुग्ध व्यवसाय करत होते.
अपघातस्थळी इमामपूर गावचे माजी सरपंच भीमराज मोकाटे, चालक मालक वाहन संघटनेचे उपाध्यक्ष मायकल पाटोळे, भगवान बोठे, अमोल भवार, राहुल जरे, संदीप टिमकरे, अमोल सुंबे, प्रशांत मोकाटे, अजय टिमकरे, संकेत टिमकरे, शिशुपाल मोकाटे यांनी मदत केली.


