Talwade Traffic: स्वागत कमान की वाहतूक कोंडीचा दरवाजा? तळवडे अर्धवट स्वागत कमानीत कंटेनर अडकला
Talwade Traffic: वर्षानुवर्षे लोखंडी टेकू उभारून ‘काम सुरू’चा दिखावा; महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

पिंपरी – देहूकडून तळवडेच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमानीचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडले आहे.
आषाढी-कार्तिकी एकादशी आणि संत तुकाराम महाराज बीज महोत्सव जवळ आला की काम सुरू असल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी लोखंडी टेकू उभारले जातात. मात्र प्रत्यक्षात स्वागत कमानीचे काम कधी पूर्ण होणार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास एक कंटेनर अर्धवट कमानी मधून वाहतूक करत असताना अडकला. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आणि काही तास वाहतूक ठप्प झाली.
चाकण व तळवडे औद्योगिक वसाहत मधून कामगारांची वर्दळ असलेल्या वेळेतच हा प्रकार घडल्याने वाहनचालक आणि कामावरून परतणाऱ्या कामगारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
एकीकडे देहू आणि आळंदी या दोन महत्त्वाच्या तीर्थनगरींना जोडणारा हा प्रमुख मार्ग; तर दुसरीकडे वर्षानुवर्षे रखडलेली स्वागत कमान यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत आहे.
संत तुकाराम महाराजांच्या देहू नगरीत दरवर्षी मोठ्या संख्येने वारकरी, भाविकांची गर्दी असते. त्यामुळे या मार्गावरील पायाभूत सुविधांचे काम नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, स्वागत कमानीचे काम मागील अनेक वर्षे लांबणीवर पडले आहे.
‘आज एखादा अपघात झाला असता तर जबाबदारी महापालिकेने आणि संबंधित ठेकेदाराने स्वीकारली असती का? मानवी जीवाचे रक्षण करण्यासाठी आणि दळणवळण सुलभ होण्यासाठी रस्त्याचे आणि स्वागत कमानीचे काम तातडीने पूर्ण करावे.’- महेंद्र चव्हाण स्थानिक नागरिक
‘पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमानीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पण देहू आणि आळंदी या दोन तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या या मुख्य मार्गावर स्वागत कमानीचे काम महापालिकेने तात्काळ पूर्णत्वास न्यावे. आज कंटेनर अडकल्याने झालेली वाहतूक कोंडी आणि काही घटना घडली तर नागरिकांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो. त्यामुळे याची गांभीर्य घेऊन पालिका प्रशासनाने तात्काळ कमानीचे काम पूर्ण करावे.’- नगरसेवक पंकज भालेकर
Unregistered Mandal: अनोंदणीकृत मंडळांना वर्गणीसाठी परवानगी बंधनकारक





