धाराशिवजवळ भीषण अपघात: चार ठार, दोन जखमी

धाराशिव – जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील डाळिंब गावाजवळ आज (मंगळवारी) सकाळी सहा वाजेच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली. सोलापूरहून (Solapur) येणाऱ्या कारसमोर कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. ती कार दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेली आणि बिदर (कर्नाटक) येथील तरुणांच्या क्रेटा कारला धडकली. या धडकेत दोन्ही कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.
मृत्यू झालेले चौघेही कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील खाशमपूर येथील रहिवासी तरुण होते. ते देवदर्शन करून गावी परतत होते. मृत तरुणांची नावे रतिकांत मारुनी बसत्रौंडा (वय ३०), शिवकुमार चितानंद वग्ने (वय २६), संतोष बजरंग बसगोंडा (वय २०) आणि सदानंद माझमी बसगोंडा (वय १९) अशी आहेत. कारचालक मनुतजीत हनुमंत मसूती (वय २९, रा. सोलापूर) आणि दिगंबर जग्गनाथ सागुलगी (वय ३१) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमरगा येथील जिल्हा उप रुग्णालयात आणले आहेत.


