मिर्झापूरमध्ये भीषण अपघात, ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकला, 10 जणांचा मृत्यू

Mirzapur Road Accident । उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे भीषण अपघात झाला आहे. कच्छवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कटका पडावजवळ ट्रक आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या धडकेत 10 मजुरांचा मृत्यू झाला. तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वाराणसीतील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व मजूर वाराणसीचे रहिवासी होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अपघाताच्या वेळी ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये सुमारे 13 मजूर प्रवास करत होते. औरईच्या तिवारी गावातून काम करून सर्व मजूर वाराणसीला परतत होते. यावेळी दुपारी 12.30 च्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी वाराणसी-प्रयागराज महामार्ग रोखून धरला असून प्रशासन नाराजांची समजूत काढण्यात व्यस्त आहे.
ट्रकने पहिले दुचाकीला धडक दिली
भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक पहिले दुचाकीला धडकला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यानंतर ट्रकचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकली. अपघातानंतर ट्रॉली उडी मारून नाल्यात पडली. त्याचवेळी ट्रकही नाल्यात पडला. अपघातानंतर घटनास्थळी एकच आरडाओरड सुरु झाली.
अपघाताबाबत सीओ अमर सिंह यांनी सांगितले की, पोलिसांना रात्री 12.30 च्या सुमारास अपघाताची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून सर्वांना बाहेर काढले. यानंतर रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि अपघातात जखमी झालेल्यांना वाराणसीला पाठवण्यात आले. तसेच सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागृहात पाठवण्यात आले.
मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले
एसपी अभिनंदन म्हणाले की, ट्रकने ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून धडक दिली. अपघातात सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागृहात पाठवण्यात आले. ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. ट्रक ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. जखमींना वाराणसीतील ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहितीही पोलिस अधीक्षकांनी दिली.





