Army Truck Accident – अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात लष्कराचा एक ट्रक रस्त्यावरून घसरून खोल दरीत पडल्याने झालेल्या अपघातात लष्कराच्या तीन जवानांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. ट्रान्स अरुणाचल हायवेवर तापी गावाजवळ मंगळवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हवालदार नखत सिंग, नाईक मुकेश कुमार आणि ग्रेनेडियर आशिष कुमार अशी मृतांची नावे आहेत. लष्कराचा हा ट्रक जवानांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या ताफ्याचा भाग होता. हा ताफा अप्पर सुबनसिरीच्या जिल्हा मुख्यालय असलेल्या दापोरिजो येथून लेपराडा जिल्ह्यातील बासरला जात होता, तेव्हा हा अपघात झाला. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यात आणि मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात मदत केली. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी तीन जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.