Jammu and Kashmir election : मुख्यमंत्रिपद शर्यतीतून फारूक अब्दुल्ला बाहेर

Jammu and Kashmir election – जम्मू-काश्मीरमध्ये निकालाआधी नॅशनल कॉन्फरन्स-कॉंग्रेस आघाडीला सरकार स्थापनेची सर्वांधिक संधी असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला मात्र मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
आमचे सरकार आले तरी मी स्वत: मुख्यमंत्री नसेन. ती जबाबदारी मी याआधीच सांभाळली आहे. मजबूत सरकार कसे बनेल आणि जनतेसमोर मांडलेला अजेंडा कसा राबवता येईल याला माझे प्राधान्य असेल.
जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळायला हवा. तसे झाल्यास जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नव्या सरकारला ठोस अधिकार मिळतील, अशी भूमिका अब्दुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.
त्यामुळे मतदानोत्तर चाचण्यांनी केलेल्या भाकितानुसार जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स-कॉंग्रेस आघाडीने वरचष्मा राखल्यास अब्दुल्ला यांचे पुत्र उमर यांचा नेतृत्वासाठी विचार होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.
सरकार स्थापनेसाठी गरज भासल्यास पीडीपीचा पाठिंबा स्वीकारण्याची तयारी असल्याचेही अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी हे राष्ट्रीय स्तरावरील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे घटक आहेत. मात्र, माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीडीपीने विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली.





