प्रभात वृत्तसेवा कळस – येथील परिसरात पावसाने कमालीची दडी मारल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी सध्या खडकवासला कालव्याच्या आवर्तनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागाने खडकवासला कालव्याद्वारे तातडीने आवर्तन सोडावे, अशी मागणी खडकवासला कालव्यालगतच्या सर्वच शेतकर्यांमधून होत आहे.मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाच्या नक्षत्रांची सुरुवात होते. 24 मेपासून पावसाच्या रोहिणी नक्षत्रासह मृग, आर्द्रा, पुष्य, पुनर्वसू आणि आता आश्लेषा नक्षत्र सुरू झाले; मात्र, जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत परिसरात सर्व नक्षत्र कोरडी गेल्याने शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेले दिसत आहेत. हवामान खात्याने दि. 22, 23 जूनपासून पावसाचे जोरदार आगमन होईल, असे भाकीत केले होते; मात्र परिसरात गेल्या पाचही नक्षत्रांत पावसाने हुलकावणी दिल्याने खरिप हंगामातील मका पिकांसह इतर पिके पाण्याअभावी कोमेजून चालली आहेत. परिसरातील ओढे, नाले कोरडे पडले आहेत. सध्या खरिप हंगामातील पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. दररोज आकाशात काळया कुठ ढगांची गर्दी दाटुन येते मात्र पाऊसच पडत नसल्याने परिसरातील शेतकर्यांनची चिंता वाढली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने खडकवासला कालव्याद्वारे तातडीने अवर्तन सोडावे अशी मागणी येथील खडकवासला कालव्यालगतच्या सर्वच शेतकर्यांमधून होत आहे.