Pune District : बळीराजाला एकाकी पडणार नाही -आमदार सोनवणे
Pune District : नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाकडून मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बेल्हे : दुष्काळाच्या झळा सोसणार्या जुन्नर तालुक्यातील आणे पठारावरील पेमदरा, आणे, शिंदेवाडी, नळवणे आणि वरुंडी गावांतील दुष्काळी परिस्थितीची आमदार शरद सोनवणे यांनी पाहणी केली. पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी शेतकर्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी तसेच पिकांच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.
पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सोनवणे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाकडून मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे पेमदरा परिसरातील शेतकर्यांना शासनाच्या मदतीची अपेक्षा निर्माण झाली आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य स्मिता कणसे, पंचायत समिती सदस्य शांताराम दाते, राजेंद्र पिंगट, श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष मधुकर दाते, आणे गावच्या सरपंच प्रियांका दाते, पंकज कणसे, आनंदा बेलकर, बाळासाहेब दाते, निवृत्ती गटकळ, मोहन बांगर, प्रशांत दाते, माजी सरपंच रंगनाथ बेलकर, माजी रोहिदास शिंदे, गाबाजी शिंदे, रखमा दाते यांच्यासह अनेक शेतकरी तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संकटाच्या या काळात आमचा शेतकरी कधीही एकाकी पडणार नाही. बळीराजाच्या डोळ्यातले अश्रू पुसून त्यांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सर्व यंत्रणेला कामाला लावले आहे.
– शरद सोनवणे, आमदार





