Pimpri : टीपी योजनेला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

चांदखेड : पीएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या टीपी योजनेविरोधात तालुक्यातील सांगवडे, दारूंबरे, साळुंबरे, गोडंब्रे व धामने गावातील शेतकऱ्यांनी एकजुटीने आवाज उठवला. सांगवडे गावातील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके आणि माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
शेतकऱ्यांनी सांगितले की, या टीपी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीवर अन्याय होणार असून शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. जमिनी गमावल्यामुळे शेती व्यवसायावर परिणाम होईल आणि गावकऱ्यांचे उदरनिर्वाह संकटात येईल. योजनेचा पुनर्विचार करून ती रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. या वेळी शेतकऱ्यांनी आपापल्या व्यथा लोकप्रतिनिधींमोर मांडल्या. त्यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय विकास योजना राबविणे अमान्य आहे.
टीपी योजनेमुळे शेतकरी वर्ग आर्थिक, सामाजिक व मानसिकदृष्ट्या अडचणीत सापडणार असल्याचे त्यांनी नमूद केले. खासदार बारणे, आमदार शेळके आणि माजी मंत्री भेगडे यांनी शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.





