Pimpri : शेतकऱ्यांनो, पीक विमा भरून सुरक्षित राहा

पवन मावळ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२५-२६ साठी मावळ तालुक्यात भात, भुईमूग आणि सोयाबीन या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलै २०२५ ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही योजना वेळेत भरावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी केले आहे.
राज्य सरकारने कप-अँड-कप मॉडेल (८०% – ११०%) नुसार विमा योजना लागू केली आहे. एका वर्षासाठी विमा कंपन्या निवडण्यात आल्या असून, बोगस विमा भरल्यास कायदेशीर कारवाई होणार आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, सोसायटी सचिव व कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी गावोगावी जाऊन प्रचार करत आहेत.
शेतकऱ्यांनी भविष्यातील संकटापासून स्वतःचा आर्थिक संरक्षणासाठी पीक विमा नक्की भरावा. विमा घेतल्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा आर्थिक फटका टाळता येतो, असे मत तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी व्यक्त केले. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज सादर करून ही योजना मोठ्या प्रमाणात स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
राज्यातील शेतकरी दरवर्षी अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, रोगराई यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करत असतात. यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी पीक विमा योजना राबवली जाते. अशी माहिती उपकृषी अधिकारी श्रद्धा देशपांडे व सहाय्यक कृषी अधिकारी विकास गोसावी यांनी दिली.
विमा योजनेची वैशिष्ट्ये
कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी दोघेही सहभागी होऊ शकतात.
नैसर्गिक आपत्ती, कीड, रोगराईमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण.
अधिसूचित क्षेत्र व अधिसूचित पिकांसाठीच विमा लागू.
नुकसान भरपाईसाठी ७०% जोखीम स्तर निश्चित.
विमा अर्ज कोठे करावा
कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत ‘योजनेत सहभागी होणार’ असल्याचे घोषणा पत्र सादर करून पावती मिळवावी. आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या CSC केंद्र, प्राथमिक कृषि पतसंस्था, व्यापारी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, किंवा अधिकृत विमा प्रतिनिधीकडे अर्ज सादर करावा.
अर्ज करताना लागणारी कागदपत्रे
7/12 उतारा (शेतकऱ्याच्या नावावर)
अग्रीस्टॅक फार्मर आयडी
ई-पीक पाहणी नोंद आवश्यक
स्वयंघोषणापत्र
आधार कार्ड
आधार लिंक असलेले बँक खाते
विमा हप्ता आणि संरक्षित रक्कम पुढीलप्रमाणे
पीक संरक्षित रक्कम शेतकरी हिस्सा
भात ६१,००० ६१०
भुईमूग ४५,००० ११२.५०
सोयाबीन ५८,००० ५८०





