नागपूर – शेतकरी आंदोलनाची स्वतःहून दखल घेत न्यायालयाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले. मात्र, या आदेशानंतरही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. पोलिसांनी न्यायालयाचे आदेश घेऊन आंदोलनस्थळी धाव घेतली, पण आंदोलकांचा विरोध पाहता त्यांना आदेशासह परत जावे लागले. शेतक-यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांना घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी चांगलेच आक्रमक झाले आहेत. बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान या आंदोलनकर्त्यांनी नागपूर-वर्धा आणि जबलपूर-हैदराबाद महामार्गासह इतर चार महामार्ग रोखून धरले. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच सुमारे २२ विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर आणि बैलगाडी मोर्चा तसेच राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही होते. नागपूर-वर्धा मार्गावरील पांजरा येथील कापूस संशोधन केंद्राजवळ शेकडो आंदोलक काल रात्रीभर मुक्काम ठोकत आणि आज ठिय्या देऊन शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरू ठेवले. त्यामुळे आज दिवसभर नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. तसेच आज सकाळी काही आंदोलक रेल्वे रुळांवर उतरले आणि रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर टायर जाळत निषेध व्यक्त केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दुसरीकडे राज्य सरकारने राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि पकंज भोयर हे आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस तैनात केले आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतो, रस्ते मोकळे करतो, पण आमची व्यवस्था तुरुंगात करावी. शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा न्यायालय सरकारला आदेश देत नाही, पण शेतकरी एक दिवस रस्त्यावर उतरले तर तात्काळ आदेश दिले जातात. आम्ही न्यायालयाचा अवमान करू इच्छित नाही. आता पोलिसांनी जबाबदारी पूर्ण करावी, पोलीस सांगतील त्या वाहनात बसायला तयार आहे’. – बच्चू कडू, माजी आमदार