Indapur : कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावू नये
Indapur ; शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून फायनान्स कंपन्यांनी संवेदनशील भूमिका घ्यावी, असे सांगतानाच शेतकऱ्यांच्या वाहनांसह अन्य कर्जांच्या वसुलीसाठी दबाव आणू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

इंदापूर : दुष्काळ, पीक नुकसान आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावू नये, असे स्पष्ट निर्देश राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून फायनान्स कंपन्यांनी संवेदनशील भूमिका घ्यावी, असे सांगतानाच शेतकऱ्यांच्या वाहनांसह अन्य कर्जांच्या वसुलीसाठी दबाव आणू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, इंदापूर तालुक्यातील घोरपडवाडी येथील लावंड वस्तीवर शेतकरी हनुमंत लावंड यांच्या घरी दिवाळी साजरी करून त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
बुलढाणा जिल्ह्यात फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या वाहनांच्या वसुलीसाठी होत असलेल्या तगाद्याचा मुद्दा गंभीर असल्याचे सांगत भरणे म्हणाले की, या प्रकरणी शासनाने कारवाई केली आहे. महसूलमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांसोबत यासंदर्भात बैठका घेण्यात आल्या आहेत. फायनान्स कंपन्यांचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून यावर योग्य तो मार्ग काढतील. पीक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यात आल्यामुळे आतापर्यंत ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे एकूण ४ हजार ३७२ कोटी रुपयांची अग्रिम मदत दिली असल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नीरा नदी आणि कालव्यांमधून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी रास्त असल्याचे कृषिमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचा मार्ग काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना १८ हजार कोटींची कर्जमाफी
आतापर्यंत चार टप्प्यांमध्ये २० लाख ७२ हजार २५० शेतकऱ्यांना १८ हजार ४० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन दिले जात असल्याचेही भरणे यांनी नमूद केले.





