Pune District : शेतकऱ्यांनी शेत जमिनीची ई-पीक पाहणी करावी

भोर : भोर तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील शेत जमिनीवरील ई-पीक पाहणी करून आपला सात बारा अद्ययावत करून घ्यावा, असे आवाहन भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन यांनी केले आहे. महाराष्ट्र शासन, कृषी विभाग रब्बी हंगाम २०२४ पासून ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे, मोबाईल अॅपद्वारे पीक नोंदणी करावयाचे काम सुरू आहे.
याची दोन प्रकारात नोंद केली जाणार असून यामध्ये शेतकरी स्तर व सहाय्यक स्तर मोबाईल अॅपद्वारे पिकांची नोंद करण्यात येणार आहे. शेतकरी स्तराचा कालावधी १ डिसेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ तर सहाय्यक स्तर १६ जानेवारी २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ७/१२ वर रब्बी हंगामातील पिकांची ई-पीक पाहणीनुसार नोंदणी केली जाणार आहे.
यामध्ये सुरुवातीला शेतकरी स्तरावरून मोबाईल अॅपव्दारे ई-पीक पाहणी नोंद करण्यात येईल व शेतकरी स्तरावरील कालावधी संपल्यानंतर सहायकांमार्फत उर्वरित शेतकऱ्यांची पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे नोंदवण्यात येईल. तसेच डिजिटल क्रॉपमध्ये गटाच्या हद्दीवर आधारित जीओ फेन्सिग बंधनकारक करण्यात आलेले आहे. म्हणजेच जोपर्यंत संबधित खातेदार / सहायक निवडलेल्या गटात जाऊन पीक पाहणी करत नाही तोपर्यंत पिकांचे छायाचित्र काढता येत नाही व पीक पाहणी अपलोड करता येत नाही.
जीओ फेन्सिग बंधनकारक असल्यामुळे गाव नकाशे अद्ययावत असल्याची खात्री भूमी अभिलेख कार्यालयामार्फत करून घेणे आवश्यक आहे. हे ई-पीक पाहणी केल्यामुळे आपणास पीक बीमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती एमएसपी अंतर्गत पिकाची नोंद तसेच अँग्रोस्टॅक अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फायद्याचे ठरणार असल्याचे तहसीलदार नजन यांनी सांगितले.





