पुणे जिल्हा | शेतकर्यांनो पशुपालन व्यवसाय कराच – निकम

पळसदेव, (वार्ताहर)- शेतकर्यांनो शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केल्यास शेतकर्यांचे आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल. पशुपालन केल्यास शेतीसाठी शेणखत उपलब्ध होऊन रासायनिक खतांसाठी होणारा लाखो रुपयांच्या खर्चाची बचत होण्यासाठी मदत होईल.
त्यामुळे शेतकर्यांनी चांगल्या पद्धतीने पशुपालन करावे व पशुंच्या आरोग्याची देखील चांगल्या प्रकारे काळजी घेतल्यास पशुपालन व्यवसाय फायदेशीरच ठरणार आहे. याबाबत शेतकर्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत ग्रामीण विकास केंद्राचे प्रभारी अधिकारी उमेश निकम यांनी बोलताना व्यक्त केले.
बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्र भिगवण आयोजित तरंगवाडी बुनगेवस्ती येथे जनावरांचे आरोग्य शिबीर अंतर्गत मोफत औषध वाटप व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी उमेश निकम बोलत होते.
यावेळी उपस्थित पशुपालक यांना ग्रामीण विकास केंद्र भिगवण मार्फत विविध प्रशिक्षण कार्यक्रमाची बँक ऑफ महाराष्ट्रच्या विविध कर्ज योजनेची महिती दिली. यावेळी डॉ. गणेश आटोळे यांनी जनावरांचे आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यावर माहिती दिली.
उपस्थित पशुपालकांना मोफत औषध वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाधिकारी उमेश निकम, देवा डॉ. गणेश आटोळेसह पशुपालक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन देवा फलफले यांनी केले तर संतोष भोंगळे यांनी आभार मानले.





