Indapur : ऑनलाइन खत खरेदी-विक्रीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद
Indapur : या प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या शेतजमिनीच्या क्षेत्रानुसार आवश्यक खतांचे ऑनलाइन आरक्षण करता येत आहे.

पळसदेव : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत २२ सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यात ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस)या मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन खत खरेदी-विक्री प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीला इंदापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने खत खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
या प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या शेतजमिनीच्या क्षेत्रानुसार आवश्यक खतांचे ऑनलाइन आरक्षण करता येत आहे. त्यानंतर एफएफएस मोबाईल ॲपद्वारे फार्मर आयडी किंवा आधार क्रमांकाच्या आधारे तयार होणारा क्युआर कोड विक्रेत्याकडे स्कॅनिंगसाठी दाखविल्यानंतर शेतकऱ्यांना खत खरेदी करता येत आहे.
त्यामुळे खत खरेदी-विक्री प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासोबतच खत वितरण व्यवस्थाही अधिक सुलभ होण्यास मदत होत असल्याची माहिती, गुणनियंत्रण कृषी अधिकारी योगेश फडतरे यांनी दिली. ऑनलाइन खत खरेदी प्रणालीची माहिती तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत संपूर्ण तालुक्यात जनजागृती कार्यक्रम, मार्गदर्शन व प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी या प्रणालीचा लाभ घेऊन ऑनलाइन पद्धतीने खतांचे आरक्षण करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, दीपक गरगडे यांनी केले आहे. तसेच ऑनलाइन बुकिंग करताना काही अडचणी उद्भवल्यास संबंधित कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
एफएफएस प्रणालीद्वारे खत खरेदी करणे अनिवार्य असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी एफएफएस मोबाईल ॲपची माहिती करून घेऊन त्याचा वापर करावा. तसेच खत विक्रेत्यांनीही ऑनलाइन बुकिंग प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य करावे. कोणत्याही शेतकऱ्याची खत खरेदी करताना गैरसोय होणार नाही, याची दक्षता सर्व विक्रेत्यांनी घ्यावी.
-योगेश फडतरे, तालुका कृषी अधिकारी (गुणनियंत्रण).





