Farmer Protest : पंजाब-हरियाणा सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे केंद्र सरकारला चर्चेचे आवाहन

चंदिगढ : पंजाब-हरियाणा सीमेवर १० महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला चर्चेचे आवाहन केले आहे. चर्चेमुळे दोन्ही बाजूंमधील विश्वासाचा अभाव कमी होईल. कोंडी फुटेल, अशी भूमिका शेतकऱ्यांकडून मांडण्यात आली आहे.
पंजाब-हरियाणा सीमेवर महिनाभरापासून उपोषण करत असणारे शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांची प्रकृती खालावली आहे. केंद्र सरकारने चर्चेचा प्रस्ताव स्वीकारल्यास वैद्यकीय उपचार घेण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. त्याविषयीची माहिती पंजाब सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली. त्यानंतर आंदोलनात सहभागी शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारला उद्देशून आवाहन केले.
मोठ्यात मोठ्या मुद्द्यांवर चर्चेद्वारे तोडगा काढता येऊ शकतो, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यांत मांडतात. शेतकरी हे देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा केली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आंदोलक शेतकऱ्यांनी विविध मागण्या पुढे केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शेतमालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी द्यावी, कर्जमाफी करावी या मागण्यांचा समावेश आहे.





