Farmers Protest : शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय! ‘चाक फिरू देणार नाही’ या इशाऱ्यानंतर अंबालिका प्रशासन नमले

प्रभात वृत्तसेवा
खेड : शेतकऱ्यांना प्रति टन ३०० रुपये अंतिम बिल द्यावे, अन्यथा कारखान्याचे चाकही फिरू देणार नाही, ऊस तोडणीसाठी तालुक्यात गावबंदी करू, असा आक्रमक पवित्रा शेतकरी बचाव कृती समितीने घेतला होता. याची दखल घेत अखेर अंबालिका प्रशासनाने दोनशे रुपयांनी अंतिम बिल अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रती टन ३००० रुपयाची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे.दिवाळी तोंडावर आली असतानाही अंबालिका शुगरने अद्याप अंतिम बिल घोषित केलेले नव्हते. या पार्श्वभूमीवर शेतकरी कृती समितीच्या वतीने अंबालिका प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले होते. यावेळी अंबालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
तालुक्याच्या शेजारील इतर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजारांहून अधिक दराने अंतिम बिल जमा केले असताना अंबालिकाने मात्र अद्याप निर्णय न घेणे शेतकऱ्यांच्या मनात तीव्र नाराजी निर्माण करणारे ठरले होते. गौरी शुगर हिरडगाव कारखान्याने प्रति टन ३१०१ रुपये दराने अंतिम बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे. बारामती ॲग्रोनेही अंतिम बिलाचा १०० रुपये दर जाहीर करून प्रति टन २९०० रुपये इतका दर दिला. मात्र अंबालिका शुगरने अद्याप प्रति टन २८०० रुपयांवरच गाळप दर थांबवला होता.
अंबालिका शुगरकडून शेतकऱ्यांना केवळ पाच किलो साखर वाटून ‘तोंड गोड’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, शेतकरी बचाव कृती समितीच्या प्रयत्नाने अंबालिका प्रशासन खडबडून जागे होत, दोनशे रुपयांचे अंतिम बिल देण्याचा शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.





