Farmers’ protest : शेतकरी व केंद्रातील चर्चेची सातवी फेरी अनिर्णीत

Farmers’ protest – हरियाणा-पंजाबच्या शंभू आणि खनौरी सीमेवर १३ महिन्यांपासून निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांसह केंद्र सरकारमधील चर्चेची सातवी फेरीही अनिर्णीत राहिला. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान, पीयूष गोयल आणि प्रल्हाद जोशी उपस्थित होते. चंदीगडमध्ये सकाळी ११ वाजता सुरू झालेली बैठक ४ तास चालली, पण या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही.
दुसरीकडे पोलिसांनी किसान मजदूर मोर्चा (केएमएम)चे संयोजक सर्वन पंढेर आणि संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय)चे जगजीत डल्लेवाल यांना ताब्यात घेतले. हे दोघे जण बैठकीला उपस्थित राहून शंभू आणि खानौरी सीमेवर परतत होते.
मोहालीच्या एअरपोर्ट रोडवर पंढेर यांना पोलिसांनी घेरले होते. डल्लेवाल रुग्णवाहिकेतून खानौरी सीमेवर परतत असताना, पोलिसांनी त्यांना संगरूरमध्ये घेरले. पोलिसांनी डल्लेवाल यांना रुग्णवाहिकेसह ताब्यात घेतले. या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी बॅरिकेडिंग आणि शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याने संगरूरमध्ये पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. शेतकऱ्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. तथापि, पंजाब पोलिसांनी अनेक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. यामुळे आता शंभू आणि खनौरीच्या सीमाही जबरदस्तीने रिकामे करू शकतात, अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने तेथे जमण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, १३ फेब्रुवारीपासून शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी निदर्शने करत आहेत. त्यानंतर दिल्लीला जात असताना हरियाणा पोलिसांनी त्यांना बॅरिकेडिंग करून रोखले होते. ते एमएसपीची हमी देणारा कायदा करण्याची मागणी करत आहेत. यापूर्वी त्यांनी चार वेळा दिल्लीला जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना शंभू सीमेपलीकडे जाऊ दिले गेले नाही.





