Satara: जिल्ह्यातील शेतकरी संघटनांचे सातार्यात खर्डा-भाकरी आंदोलन
Satara

Satara: उसाला प्रतिटन 3 हजार 800 रुपये दर देण्याच्या घोषणेने शेतकर्यांचे समाधान होण्याऐवजी त्यांच्यात नाराजीचा उद्रेक झाला आहे. 3800 रुपयांचा दर शेतकर्यांना मान्य नसल्याचा इशारा देत जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खर्डा-भाकरी आंदोलन करून शासन आणि साखर कारखानदारांचे लक्ष वेधले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात खर्डा-भाकरीचे प्रतीकात्मक सादरीकरण करण्यात आले. शेतकर्यांच्या कष्टाची आणि त्यांच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. शेतकरी राबतो, घाम गाळतो; मात्र त्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नसेल तर शेती व्यवसाय टिकणार कसा, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
शेतकर्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली. केवळ दर जाहीर करून प्रश्न सुटणार नाहीत तर उत्पादन खर्चाचा वास्तववादी विचार करून शेतकर्यांना न्याय देणारा दर निश्चित करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येत केलेल्या या आंदोलनामुळे ऊसदराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता शासन आणि साखर कारखानदार यावर काय भूमिका घेतात, याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.





