Pune District : शेतकरी संकटात, संचालकांचा सत्कार मात्र थाटात
Pune District : सध्या तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या गंभीर संकटाला सामोरे जात आहे. पाण्याची टंचाई, घटलेले पीक उत्पादन, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि वाढता आर्थिक ताण यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

भिगवण : एकीकडे दुष्काळाच्या झळांनी शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना दुसरीकडे कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी संधी मिळालेल्या संचालकाचा जाहीर सत्कार सोहळा मोठ्या थाटामाटात व वाजतगाजत पार पडला. शेतकऱ्यांच्या अडचणींचा डोंगर कायम असताना झालेल्या या सत्कार सोहळ्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा संचालकांच्या सत्कारालाच अधिक महत्त्व दिले जात असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.
सध्या तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या गंभीर संकटाला सामोरे जात आहे. पाण्याची टंचाई, घटलेले पीक उत्पादन, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि वाढता आर्थिक ताण यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या कारखान्याच्या संचालकांकडून त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची अपेक्षा होती. मात्र, या कठीण परिस्थितीत पार पडलेल्या सत्कार सोहळ्यावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
कारखाना अद्याप पूर्ण क्षमतेने चालू झाला नसताना तसेच दुसरीकडे आगामी गाळप हंगाम, उसाला मिळणारा दर आणि थकीत हप्त्याचा प्रश्न असे अनेक विषय प्रलंबित असताना संचालकांच्या सत्काराचा झालेला गाजावाजा चर्चेचा विषय ठरला आहे. या सोहळ्याच्या आयोजनासाठी कार्यकर्त्यांनीही मोठी धावपळ केली. मात्र, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी अशीच तत्परता दाखवली असती, तर त्याचा अधिक उपयोग झाला नसता का, असा सवाल आता तालुक्यातील शेतकरी विचारू लागले आहेत.
सहकारी साखर कारखान्याचे संचालकपद ही केवळ प्रतिष्ठा मिरवण्याची संधी नसून शेतकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाची जबाबदारी आहे. ज्या शेतकऱ्यांच्या घामावर कारखान्याचे अर्थकारण उभे आहे, त्याच शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेत दिवस काढावे लागत असतील, तर सत्काराच्या झगमगाटापेक्षा त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक अधिक महत्त्वाची ठरते.
कर्मयोगी कारखान्याची निवडणूक यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे बिनविरोध झाली. नवनिर्वाचित संचालक मंडळ निवडून आल्यानंतर एवढे सत्कार घेत आहे की, ते तालुक्यातील दुष्काळ विसरून गेले आहेत.
-ऍड. सुनील कन्हेरकर, मार्गदर्शक, शेतकरी संघटना.





