Farmer Crisis : बळीराजा हवालदिल! पेट्रोल-डिझेल आणि गॅस महागला, पण शेतमालाला मात्र कवडीमोल भाव
Farmer Crisis : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ; शेती मशागत, सिंचन आणि खतांचा खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात.

Farmer Crisis – पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. एकीकडे इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे वाहतूक, शेती मशागत, सिंचन, खत व औषधांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पालेभाज्या आणि इतर भाजीपाल्याला बाजारात अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
सध्या बाजारात मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, कांदा, टोमॅटो, वांगी आणि इतर भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातून माल बाजारात नेण्यासाठी होणारा वाहतूक खर्च, मजुरी आणि इतर खर्च वजा केल्यानंतर हातात काहीच राहत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. ट्रॅक्टर, पंप, मालवाहतूक यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. याशिवाय घरगुती गॅसच्या वाढत्या दरामुळे कुटुंबाचा खर्चही वाढला आहे. मात्र, शेतमाल विक्रीच्या वेळी योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट ओढवले आहे.
बाजारभाव स्थिर ठेवा…
महागाईमुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसत असतानाच शेतकरीही अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्च वाढत असताना उत्पन्न मात्र घटत असल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने शेतमालाला हमीभाव देण्याबरोबरच बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी संघटना व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अन्यथा शेती व्यवसाय टिकवणे कठीण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.





