नगर | कृषी विभागाच्या कारभारामुळे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

नेवासा, (प्रतिनिधी) – तालुक्यातील नेवासा बुद्रुक, सोनई, चांदा, घोडेगाव या मंडळाचा २५ टक्के अग्रीम आणि उर्वरित पीक विमा नुकसान भरपाई तसेच कापूस, तूर, सोयाबीन व इतर खरीप हंगामातील २०२३-२४ च्या विमा रक्कम नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित आहेत. प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन चर्चा केली. कृषी विभागाच्या त्रुटी लक्षात आणून देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर कृषी विभागाला निवेदन दिले आहे.
जिल्हा कृषी अधिकारी बोराळे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावून घेतले. संबंधित शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या परखड शब्दांत सूचना केल्या. निवेदन देताना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे, शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष हरी तुवर यांनी १५ मार्चपर्यंत या मंडळातील शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास जिल्हा कृषी अधिकारी व नेवासा तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून कार्यालयाबाहेर मुक्काम आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.
याप्रसंगी डॉ.रोहित कुलकर्णी, प्रहार जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, प्रहार रुग्णसेवक नयन पुजारी, नचिकेत कुलकर्णी, बाळासाहेब मतकर, मुसा शेख, तुकाराम घोगरे, नवनाथ क्षीरसागर, योगेश पवार, भगवान शेळके, अशोक तुवर चारही मंडळातून आलेले शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





