Faridabad Murder : पार्किंगच्या वादातून माजी टेक महिंद्रा अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या; फरीदाबादमध्ये 15 राऊंड फायरिंग
Faridabad Murder : हरियाणातील फरीदाबादमध्ये पार्किंगच्या वादातून माजी टेक महिंद्रा अधिकारी परमजीत धनखड यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आरोपी मोनू शर्मा याला पोलिसांनी अटक केली.

Faridabad Murder : हरियाणातील फरीदाबाद येथे पार्किंगच्या जागेवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. परमजीत धनखड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते टेक महिंद्रामध्ये आशिया-पॅसिफिक विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. सध्या ते सिंगापूरमधील एका आयटी कंपनीत कार्यरत होते.
भाच्याच्या लग्नासाठी ते भारतात आले होते. ६ नोव्हेंबरच्या रात्री शेजारी मोनू शर्मा याच्याशी पार्किंगवरून वाद झाला. यावेळी आरोपीने परवानाधारक पिस्तुलातून १५ ते १६ गोळ्या झाडल्या. त्यापैकी नऊ गोळ्या परमजीत यांना लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कुत्र्यामुळेही वादाची ठिणगी –
पोलिसांच्या माहितीनुसार, फरीदाबादमधील सेक्टर २१ सी येथील एका इमारतीत परमजीत यांचे कुटुंब पहिल्या मजल्यावर, तर आरोपी मोनू शर्मा याचे कुटुंब तिसऱ्या मजल्यावर राहत होते. दोन्ही कुटुंबांमध्ये वाहनांच्या पार्किंगवरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. आरोपीचा मुलगा पार्किंगच्या जागेत कुत्र्याला शौचास नेत असल्यानेही दोन्ही कुटुंबांमध्ये यापूर्वी वाद झाले होते.
जिममधून परतल्यानंतर गोळीबार –
परमजीत ५ नोव्हेंबरला सिंगापूरमधून भारतात आले होते. ६ नोव्हेंबरच्या रात्री जिममधून घरी परतल्यानंतर त्यांच्या ठरलेल्या पार्किंगच्या जागेत आरोपीची कार उभी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कार हटवण्यास सांगितल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्याचे रूपांतर गोळीबारात झाले.
घटनेनंतर आरोपी कुटुंबासह फरार झाला होता. मात्र, पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करून मोनू शर्मा याला अटक केली. परमजीत यांच्या मुलाच्या तक्रारीवरून आरोपीसह त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.





