प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना दुबईमध्ये अटक

नवी दिल्ली : प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांच्यावर दुबई पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांना दुबई विमानतळावर अटक करण्यात आले आहे. राहत फतेह अली खान यांना अटक करण्यात आल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. राहत फतेह अली खान यांच्या माजी मॅनेजरने दिलेल्या तक्रारीवरून त्यांना अटक करण्यात आली आहे.
‘या’ कारणामुळे करण्यात आली अटक
राहत फतेह अली खान यांचे माजी मॅनेजर सलमान अहमदने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. राहत फतेह अली खान हे त्यांच्या एका संगीत कार्यक्रमासाठी दुबईला गेले असता त्यांना तिथेच अटक करण्यात आली. राहत फतेह अली खान यांना यूएईमध्ये बुर्ज दुबई पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
‘या’ अगोदरदेखील सापडले होते वादात
राहत यांची वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यावर्षी जानेवारीमध्ये त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते आपल्या नोकराला मारहाण करताना दिसत होते. मात्र, नंतर त्यांनी त्याबद्दल माफीही मागितली होती.
राहत फतेह अली खान यांची प्रसिद्ध गाणी
राहत फतेह अली खान हे पाकिस्तानातील मोठे नाव आहे. त्यांनी पाकिस्तानी तसेच बॉलिवूड चित्रपटांसाठी अनेक गाणी गायली आहेत. ‘जरुरी था’, ‘तू इतनी खूबसूरत है’, ‘मैं जहाँ रहूं’, ‘तुम्हे दिल्लगी भूल जानी पडेगी’ ही त्यांची काही लोकप्रिय गाणी आहेत.





