Uma Qureshi’s brother murdered : बॅालिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या भावाची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये पार्किंगवरून हुमाचा भाऊ आसिफ कुरेशीची हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हत्येमागचं कारण पार्किंगचा वाद असल्याचं सांगण्यात आलं आहे. नेमकं काय घडलं? गुरुवारी रात्री निजामुद्दीनच्या जंगपुरा भोगल बाजार लेनमध्ये स्कूटी गेटवरून काढून बाजूला पार्क करण्यावरून वाद झाला. या वादात आरोपीने आसिफ कुरेशीवर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या असिफला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, पोलिसांनी काळी वेळातच हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. नातेवाईकांचा गंभीर आरोप या बातमीचे वृत्त आजतकने दिले आहे. आज तकच्या रिपोर्टनुसार, आरोपींनी क्षुल्लक कारणावरून आसिफ कुरेशी यांची हत्या केली असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार आसिफवर यापूर्वीही हल्ला झाला आहे. त्याला मारण्यासाठी त्याच्यासोबत दोनदा जाणूनबुजून भांडण करण्यात आलं होतं. अभिनेत्रीकडून अद्यापर्यंत निवेदन नाही मृत व्यक्ती ही बॅालिवूड अभिनेत्रीच्या नात्यातली असून याबाबत अद्याप अभिनेत्री हुमा कुरेशीने निवेदन दिलेलं नाही. आसिफच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. हेही वाचा : Pimpri News | पिंपरीत घरगुती गॅस सिलिंडरमधून अवैधरित्या गॅस भरणाऱ्या दोघांना अटक