Pimpri News | पिंपरीत घरगुती गॅस सिलिंडरमधून अवैधरित्या गॅस भरणाऱ्या दोघांना अटक

प्रभात वत्तसेवा
पिंपरी – घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आले आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (दि. ६) निघोजे गावातील संस्कार गॅस एजन्सी अँड रिपेअरिंग सेंटर येथे करण्यात आली.आकाश विजय गोसावी (वय २०, रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) आणि तीर्थराज विठ्ठल गिरी (वय ३४, रा. अंबी जळगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल गोविंद डोके यांनी बुधवारी (दि. ६) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींकडे गॅस रिफिलिंगसाठी कोणताही परवाना नव्हता.
लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल हे माहीत असतानाही, ते ज्वालाग्राही पदार्थांबाबत पुरेशी खबरदारी न घेता घरगुती सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस काढत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण ११ लाख ६ हजार ११० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात ८७ घरगुती आणि एक लहान असे एकूण ८८ गॅस सिलिंडर, एक वजन काटा, गॅस रिफिल करण्याचे साहित्य आणि एक चारचाकी वाहन यांचा समावेश आहे.





