Famine in Gaza : गाझामध्ये संयुक्त राष्ट्राकडून दुष्काळ जाहीर

गाझा : गाझामध्ये भीषण दुष्काळ पडल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अन्न सुरक्षाविषयक संस्थेने जाहीर केले आहे. गाझा पट्ट्यातील गाझा सिटी या सर्वात मोठ्या शहरामध्ये दुष्काळाची स्थिती आहे. युद्धबंदी जाहीर झाली नाही आणि गाझा पट्ट्यात मानवतावादी मदतीवरील निर्बंध हटवले गेले नाहीत, तर हा दुष्काळ संपूर्ण भूप्रदेशात पसरण्याचा धोका आहे, असेही संयुक्त राष्ट्राच्या इंटिग्रेटेड फूड सिक्युरीटी फेज क्लासिफिकेशन किंवा आयपीसीने म्हटले आहे.
गाझा सिटी या शहराची लोकसंख्या ५ लाख आहे. हा दुष्काळ पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत दक्षिणेकडील देर अल-बलाह आणि खान युनिस या शहरांमध्ये पसरू शकतो, असे आयपीसीने म्हटले आहे. गाझामध्ये दुष्काळसदृश्य स्थिती असल्याचे आयपीसीच्यावतीने गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सांगितले जात होते. हा दुष्काळ पडू नये, यासाठी गाझामध्ये आंतरराष्ट्रीय मदतीवरील निर्बंध हटवणे आणि लष्कराचे हल्ले थांबवणे अत्यंत गरजेचे असल्याचा इशारा नेहमी दिला जात होता.
गाझामधील भीषण स्थितीबाबत आयपीसीने दिलेल्या इशाऱ्यानुसार प्रथमच दुष्काळाची घोषणा केली गेली आहे. ही घोषणा झाल्यावर आता युद्धबंदीसाठी इस्रायलवरचा आंतरराष्ट्रीय दबाव आता आणखी वाढणार हे निश्चित आहे. इस्रायलवर हमासने ७ ऑक्टोबर २०२३ च्या हल्ल्यानंतर गाझावर आक्रमण केले. तेंव्हापासून गाझा पट्ट्याची नाकाबंदी करण्यात आली असून मानवतावादी मदतीचा ओघ खंडीत करण्यात आला आहे.
आता गाझामधील आक्रमणाची व्याप्ती आणखी वाढवली जाणार असल्याची आपली योजना असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. त्यानुसार गाझा सिटी आणि हमासच्या ठिकाणांचे लष्कराकडून नियंत्रण घेतले जाणार आहे. मात्र गाझामधील उपासमारीचे संकट अधिकच गडद होण्याची भीती आहे. गाझामधील संघर्ष आणि नाकाबंदी, गाझामधील पॅलेस्टिनी मोठ्या प्रमाणावर विस्थापित होणे आणि गाझामधील अन्नधान्याचे उत्पादनच खंडीत झाल्यामुळे हे उपासमारीचे संकट निर्माण झाल्याचे आयपीसीने म्हटले आहे. गेल्या २२ महिन्यांच्या युद्धाच्या स्थितीमुळे ही स्थिती अत्यंत धोकादायक पातळीपर्यंत वाढली आहे. गेल्याच महिन्यात आयपीसीने या स्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली होती. पण दुष्काळाची अधिकृत घोषणा केली नव्हती.
नेतान्याहू यांनी फेटाळली स्थिती
गाझामध्ये उपासमारीची स्थिती असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी फेटाळले आहे. उपासमारीबाबतचा खोटेपणा हमास पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण गाझातील स्थितीबाबतचे फोटो आणि बालकांच्या भूकबळीबाबतचे वृत्तांत प्रसिद्ध झाल्यावर इस्रायलने गाझामध्ये अतिरिक्त मानवतावादी मदत पोचवण्यास अनुमती दिली. तरी देखील उपलब्ध करून दिली जात असलेली मदत खूपच अपुरी असल्याचे संयुक्त राष्ट्र आणि पॅलेस्टिनींचे मत आहे. दुष्काळाबाबतचे दावे बिनबुडाचे आणि खोटे असल्याचे इस्रायलच्या लष्करानेही म्हटले आहे. इस्रायलकडून पुरेशी मदत उपलब्ध करून दिली जाते आहे. विशेषतः हवाई मार्गांने मदत उपलब्ध करून दिली जात असल्याकडे इस्रायली लष्कराने लक्ष वेधले आहे.





