प्रभात वृत्तसेवा भोर – दीडघर (ता.भोर) येथे घरामधील गँस सिलेंडरच्या गळतीमुळे अचानक स्फोट होऊन झालेल्या आगीत दोन घरे भस्मसात झाली आहेत. आगीमुळे दोन्ही घरामधील साहित्यासह सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले. महसूल विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे. क्षणार्धात बांदल यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. या कुटुंबांना आगीची झळ बसली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.दीडघर येथील यमुना रघुनाथ बांदल व दिनेश काशिनाथ बांदल यांची एकाच वाड्यात शेजारी- शेजारी घरे होती. आगीमुळे ही दोन्ही घरे आगीत भस्मसात झाली आहेत. ग्रामस्थांसह दोन अग्निशामक दलाच्या गाड्यांने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु लाकडी तुळई व कौलारु असलेली ही दोन्ही घरे खाक झाली आहेत. ही घटना मंगळवारी (दि.२) सकाळी नऊच्या दरम्यान घडली. एका घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. घराचे छप्पर जळु लागल्याचे शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आले. यावेळी घरातील यमुनाबाई या शेतात गेल्या होत्या. शेजारील दुसऱ्या घरातील दिनेश बांदल हे त्यांच्या नवीन बांधलेल्या घरामध्ये होते. या दोघांना आग लागल्याचे सांगून तातडीने बोलावले. यावेळी ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. यादरम्यान गावातील सामाजिक कार्यकर्ते सचिन बांदल यांनी पीएमआरडीएच्या अग्निशमन केंद्रास तसेच भोर नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्रास माहीती दिली. काही वेळाने पीएमआरडीएच्या अग्निशमन केंद्राच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांच्या सहाय्याने ग्रामस्थांनी तीन तासांनी आग आटोक्यात आणली. आग एवढी रौद्र होती की, परिसरातील कौलारु लाकडी घरांना देखिल आगीची धग लागत होती.सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीमुळे घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. यात रोकड व साडेपाच तोळे सोने आणि घर असे मिळून दहा लाख रुपये वस्तूंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. नसरापूरचे महसूल मंडलाधिकारी प्रदीप जावळे, ग्राममहसूल अधिकारी सचिन ढोरे, ग्रामपंचायत अधिकारी सरला नलावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. महसूल अधिकारी ढोरे यांनी नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी पोलीस पाटील निता सोंडकर, ग्रामस्थ उपस्थित होते.