दौंडमध्ये भीषण स्फोट! हॉटेलचे पत्रे हवेत उडाले; १० कर्मचारी आगीच्या विळख्यात,सहा जण गंभीर

प्रभात वृत्तसेवा
दौंड – दौंड–पाटस अष्टविनायक मार्गावरील मांढरे मळा येथील हॉटेल जगदंबामध्ये भटारखान्यातील घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचा दुपारी स्फोट झाला. या स्फोटात हॉटेलमधील दहा कर्मचारी भाजले असून त्यापैकी सहा जण गंभीर आहेत.दौंड शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल जगदंबामध्ये अचानक झालेल्या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोटाच्या तीव्रतेमुळे हॉटेलचे पत्रे उडून गेले.
तर दर्शनी भागातील काचेच्या खिडक्या तावदानासह खाली कोसळल्या. स्फोटात भाजलेल्या कर्मचाऱ्यांना मांढरे मळा येथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ दौंड शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी गंभीररित्या भाजलेल्या सहा कर्मचाऱ्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच दौंड नगरपालिका तसेच कुरकुंभ एमआयडीसी अग्निशामक विभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, दौंड पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीत भाजलेल्या दहा जणांपैकी सहा जण गंभीररित्या जखमी झाले असल्याची माहिती दौंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली आहे.
सिलंडरचा साठा बाहेर काढल्याने आगीवर नियंत्रण
अग्निशामक कर्मचाऱ्यांनी हॉटेलमधून एकूण २१ सिलेंडर बाहेर काढले असून त्यामध्ये १४ घरगुती वापराचे व ७ वाणिज्य वापराचे सिलेंडर असल्याची माहिती देण्यात आली. मोठ्या प्रमाणात एलपीजी सिलेंडरचा साठा असतानाही वेळेवर आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.





