Baur Khind : बौर खिंडीत पडलेले झाड ‘जैसे थे’; अपघाताचा धोका वाढला
Baur Khind : नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

कान्हे – कामशेत-पवनानगर मार्गावरील बौर खिंड येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळून मोठे झाड रस्त्यावर पडले आहे. ही घटना घडून पाच दिवस उलटले, तरीही झाड आणि दरड हटविण्यात आलेली नसल्याने वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरड आणि पडलेल्या झाडामुळे रस्ता अरुंद झाला असून वळणाच्या ठिकाणी समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे या मार्गावर मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मार्गावरून दररोज मोठी वर्दळ असल्याने धोका अधिक वाढला आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाचे अनेकदा लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची तक्रार केली आहे. निवडणुकीच्या काळात विकासाची आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणा या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची नाराजीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
बौर खिंड परिसरातील पडलेले झाड, झुडपे आणि दरड तातडीने हटवून रस्ता सुरक्षित करावा. तसेच भविष्यात अशा घटनांनंतर त्वरित उपाययोजना करण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
‘बौर खिंडीत गेल्या पाच दिवसांपासून दरड आणि पडलेले झाड तसेच पडून आहे. या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक प्रवास करतात. कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो.’ – काळुराम दळवी, स्थानिक नागरिक
Moshi Building Collapse: कोसळलेली इमारत अनधिकृत? महापालिकेच्या दिव्याखालीच अंधार





