Nagar | गटारी अमावस्या साजरी करण्याच्या नादात मद्यशौकिनांची पडझड!

नेवासा ,(प्रतिनिधी)- आषाढ महिन्यातील शेवटचा सुट्टीच्या दिवशी आलेल्या रविवारी गटारी अमावस्याच्या आनंद लुटण्यासाठी अनेक तळीरामांनी भल्या सकाळीच दारुचा आस्वाद घेतला. मांसाहावर ताव मारण्यासाठी चिकण – मटनाच्या दुकानांसमोर तोबा गर्दी करत हातात काळ्या बॅगा घेऊन घरचा रस्ता धरल्याचे दिसून आले.
परमिट रुम, बिअरबारमध्ये आजचा दारू पिण्याचा शेवटचा दिवस असल्याच्या आणाभाका घेत मनमुराद दारूचा आस्वाद घेतला. काही मद्यशौकिनांनी ओव्हर डोस घेतल्यामुळे गटार अमावस्याच्या दिवशीच रिमझिम पावसात पाय घसरून पडत गटारी साजरी केली.
आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस अन् त्यामध्ये सुट्टीचा वार रविवार हा योगयोग जुळून आल्यामुळे अनेक बहाद्दरांनी सकाळपासूनच मनसोक्त दारु रिचली.
सोमवारपासून श्रावण सुरू होत असल्याचा आनंद लुटण्यासाठी दारुच्या दुकानांमध्ये गर्दी केल्याचे दिसून आले. आषाढ महिन्याचा शेवटचा रविवार साजरा करुन आनंद व्दिगुणित करण्यासाठी चिकन – मटनाच्या दुकानासमोर तोबा गर्दी केल्यामुळे गटार अमावस्याची प्रचिती सर्वसामान्य नागरिकांना आली.
अनेक मित्रमंडळांनी जोरदार गटारी साजरी करण्याचे नियोजन आखून एकावर एक दारुच्या बाटल्या रिकाम्या करत उद्यापासून श्रावण पाळण्याच्या आणाभाकाही घेतल्या. काही ठिकाणी मटन,चिकन चांगले मिळण्यासाठी मद्यपींनी दुकानात किरकोळ गोंधळ घातला.
बियरबार आणि दारुच्या दुकानातही एकमेकांना दारू सांगण्यावरून किरकोळ वाद घातले. ओव्हरडोस झाल्यामुळे बॅगेतील चिकन आणि मद्यपी रस्त्याच्या बाजूला पडल्यामुळे आणि कुत्र्यांनाही गटारी अमावस्याची मेजवानी मिळाल्याचे चित्रही बहुतांशी ठिकाणी गटारी अमवस्याच्या दिवशी दिसून आले.





