पुणे विद्यापीठाचा १२४ वा पदवी प्रदान समारंभ ३ जुलैला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२४ वा पदवी प्रदान समारंभ दि. ३ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कुलगुरू डाॅ. सुरेश गोसावी , प्र-कुलगुरू डाॅ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डाॅ. विजय खरे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांच्यासह विद्यार्थी व विविध मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील ७ हजार १२५ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहेत.
विद्यापीठाच्या इनडोअर हॉलमध्ये दुपारी १२.३० वाजता होणाऱ्या या समारंभात ४ हजार ८१४ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र, २ हजार २० विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र, ३५ विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्र, २३९ विद्यार्थ्यांना पीएच.डी.
१४ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी पदविका प्रमाणपत्र तर ३ विद्यार्थ्यांना एम.फिल.चे प्रमाणपत्र मिळणार आहे. या कार्यक्रमात विविध विद्याशाखांमधील गुणवंत ७१ विद्यार्थ्यांना ११७ सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत.




