Pune : बनावट गुणपत्रिकेद्वारे टपाल खात्यात नोकरी

पुणे : दहावी उत्तीर्ण झाल्याची बनावट गुणपत्रिका सादर करुन टपाल खात्याची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
रमेश भिकाजी मुळे ( २२, रा. अलकुटी, ता. पारनेर) असे तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सचिन कामठे ( ३८, रा. सागर पार्क, वडगाव शेरी) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टपाल खात्याकडून डाकसेवक पदासाठी भरती प्रक्रिया राबविली होती. ग्रामीण डाक सेवक ऑनलाइन भरती महाराष्ट्र सर्कल २०२३ (सायकल ५) परीक्षेत रमेश मुळे याने दहावी उत्तीर्ण असल्याबाबतचे बनावट प्रमाणपत्र सादर केले. बनावट प्रमाणाद्वारे त्याने नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला.
शहर टपाल कार्यालयातील (सिटी पोस्ट) अधिकारी सचिन कामठे यांनी गुणपत्रिकेची पडताळणी केली. तेव्हा गुणपत्रिका बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे तपास करत आहेत.





