Fake IPS Officer : मी IPS अधिकारी आहे! माय-लेकींचा हाय-प्रोफाईल गंडा ; महागड्या चपलांसाठी बनावट ओळखपत्र

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मी आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून चप्पल दुकानात फसवेगिरी करणाऱ्या माय-लेकींना लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. या दोघींची नावे मिनाज मुर्तजा शेख (४०, रा. बुर्ज अल मर्जाना सोसायटी, कोंढवा) आणि तिची मुलगी रिबा मुर्तजा शेख (१९) अशी आहेत. मिनाजने आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून बनावट ओळखपत्र दाखविले. लग्नासाठी १७ हजारांच्या चपला, सॉक्स असा माल घेतला. पैसे देण्यासाठी कामगाराला पोलीस आयुक्तालयाकडे पाठवून द्या असे सांगत स्वतः मालासह पसार झाल्या.
याप्रकरणी आडाम इक्रराब शेख (रा. भवानी पेठ, पुणे) यांनी तक्रार दिली असून त्यांचे एम.जी.रोडवर क्लीज नावाचे चपलांचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात १३ सप्टेंबरला मायलेकी आल्या होत्या. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शेख यांनी लष्कर ठाण्यात तक्रार दिली. उपनिरीक्षक स्वाती भराड यांनी तपास केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस अंमलदार लोकेश कदम व अमोल कोडीलकर यांनी आरोपींचा शोध घेतला. त्यांना दोन दिवसांपुर्वी अटक झाली. तपासात आरोपींकडून ४५ हजारांच्या चपला आणि इमिटेशन ज्वेलरी जप्त केली.
क्लीज बरोबर कॅम्पमधील मचमोर या दुकानातही त्यांनी फसवणूक केली. दोघींविरुद्ध यापूर्वीही कोंढवा पोलिस ठाण्यात फसवणुकीचे तीन वेगवेगळे गुन्हे नोंदले गेले आहेत.ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप पवार, उपनिरीक्षक स्वाती भराड, अंमलदार सचिन खोलासे, महेश कदम, लोकेश कदम, सागर हराळ, अमोल कोडीलकर, महिला अंमलदार आखाडे, बनसुडे यांच्या पथकाने केली.आरोपींनी अशा प्रकारे इतरांचीही फसवणूक केल्याची शक्यता असून संबंधितांनी लष्कर ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.





