पुणे : स्वतःला आयपीएस अधिकारी असल्याचे सांगत थेट पुणे पोलीस आयुक्तालयात पोहोचलेल्या एका तरुणाचे पितळ शेवटी उघड झाले आहे. सागर वाघमोडे असे या बनावट अधिकाऱ्याचे नाव असून, त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील रहिवासी असलेला सागर वाघमोडे हा स्वतःला आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून विविध ठिकाणी फिरत होता. शनिवारी सायंकाळच्या सुमारास तो पुणे पोलीस आयुक्तालयात आला आणि एका वरिष्ठ पोलीस उपायुक्तांना भेटला. संवादादरम्यान त्याने “माझा मित्रही आयपीएस अधिकारी आहे” असे सांगून एका अधिकाऱ्याचे नाव घेतले. योगायोगाने त्या नावाचा खरा आयपीएस अधिकारी त्याच वेळी समोर आल्यानंतर वाघमोडेचा भांडाफोड झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ बंडगार्डन पोलिसांना बोलावून वाघमोडेला ताब्यात दिले. त्याची कसून चौकशी सुरू असून, तो आयुक्तालयात नेमका कोणत्या उद्देशाने आला होता, कुणाला भेटला आणि स्वतःला आयपीएस म्हणवण्यामागे त्याचा हेतू काय होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.