मोदी सरकारकडून पाठ्यपुस्तकांमधून खोटा इतिहास

सातारा – महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आदी राष्टपुरुषांबाबत मोदी सरकार पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून खोटा इतिहास पसरवत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. महागाई, बेरोजगारीकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत असून या गंभीर प्रश्नांबाबत राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाची निवड लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्या चव्हाण यांनी राष्ट्रवादी भवनात आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, “”केंद्रातील मोदी सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजात दुही निर्माण करण्याचे काम करत आहेत. यापूर्वी कधीही पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून कोणाची बदनामी झाली नाही अथवा कोणाचा अजेंडा राबवला गेला नाही. मात्र, सध्याचे मोदी सरकार पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून खोटा इतिहास पसरवून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांच्याबद्दल देशाला आदर होता आणि राहणार आहे. मात्र, केंद्रातील मोदी सरकार राष्ट्रपुरुषांचा इतिहास पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून बदलत असून हे देशासाठी घातक आहे.”
देशात, राज्यात महागाई, बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतानाही त्याकडे सरकारचे दुुर्लक्ष होत आहे.
या गंभीर प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर महिला राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा स्तरावर नियोजन बैठका घेण्यात येणार असून या आंदोलनाच्या माध्यमातून सरकार विरोधातील असंतोष उफाळून येणार आहे. देशात, राज्यात सध्या ढोंगी हिंदुत्व बिंबवण्याचे काम सुरु आहे. मुलभूत प्रश्नांवर आवाज उठवण्यापेक्षा समाजात दुही निर्माण करण्यासाठी सरकार काम करत आहे. देशातील उद्योगधंदे वाढवण्याऐवजी मोदी, शहांकडून देशातील उद्योगधंदे विकण्याचे काम होत आहे. भाजप पैशाच्या जोरावर सत्ता मिळवत असल्याचा प्रत्यत सातारा जिल्ह्यातही ग्रामपंचायत निवडणुकीत आल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस बळकट असून बालेकिल्ला कायम ठेवण्यासाठी पक्षीय पातळीवरुन प्रयत्न होत आहेत. महिला आघाडी, युवती आघाडी व इतर सेलच्या कारभारात आगामी काळात आणखी सुधारणा झाल्याचे दिसून येईल. आगामी सर्व निवडणुका हे ताकतीवर लढवल्या जातील, असेही विद्या चव्हाण म्हणाल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, विभागीय अध्यक्ष कविता म्हेत्रे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, शफिक शेख, राजेंद्र लावंघरे आदी उपस्थित होते.
“ईडी’चा केंद्राकडून गैरवापर
ईडी, सीबीआय, आयकर विभाग या यंत्रणांचा गैरवापर करुन अनेक राज्यांमधील सरकारे पाडण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे. वास्तविक या त्रयस्थ संस्था असतानाही अशा संस्थांचा राजकीय वापर होत असेल तर तो निश्चितच चुकीचा आहे. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये कसलेही पुरावे सापडले नसल्याने अशा खोट्या कारवायांचा बुरखा फाटला आहे. सरकारने खोट्या कारवाया थांबवल्या नाहीत तर प्रसंगी आंदोलन करावे लागेल. मोहित कंभोज यांचे उद्योग संपूर्ण राज्याला माहिती असून त्याने आरोप करताना पुरावे द्यावेत, असा इशाराही विद्या चव्हाण यांनी दिला.





