सूरत – गुजरातमधील सूरतमध्ये बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम राबवत असताना पोलिसांनी एका महिलेसह एका पुरुषाला अटक केली आहे. हे लोक डॉक्टर असल्याचे दाखवून रुग्णांवर उपचार करत असल्याचा आरोप केला जात आहे. महिलेने 12 वी, तर पुरुषाने 10 वीपर्यंत शिक्षण घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. सूरतच्या उमरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. डीसीपी विजय सिंह गुर्जर यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाचे नाव प्रयाग रामचंद्र प्रसाद आहे, तर महिलेचे नाव ललिता कृपा शंकर सिंह आहे. हे दोघेही लोकांवर अँलोपॅथीची औषधे देऊन उपचार करायचे. त्यांनी एक दवाखानाही उघडला होता. पोलिसांनी त्यांच्याकडे सर्टिफिकेट मागितले असता त्यांच्याकडे कोणतेही सर्टिफिकेट मिळाले नाही. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपी सूरतमध्ये किती वर्षांपासून डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत होते, हे समजले नाही.