मुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब होताच फडणवीसांचे पहिले भाषण; म्हणाले “आता जबाबदारी वाढली…”

Devendra Fadnavis | राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतील स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मागील काही दिवसांपासून राजकीय हालचालींना वेग आला होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर आज झालेल्या महायुतीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला कोअर कमिटीतील सर्व नेत्यांनी मंजुरी दिली आहे. फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.
आज विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये आपलं पहिलं भाषण केलं. या भाषणात त्यांनी त्यांच्यासोबत महायुतीच्या गेल्या सरकारमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आणि सर्व आमदारांचे, जनतेचे आभार मानले. यावेळी त्यांनी ‘एक है तो सेफ है’चा देखील नारा दिला.
“एकमतानं माझी विधीमंडळ गटनेतापदी निवड केल्याबद्दल सर्व आमदारांचे आभार मानतो. खरं म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की या वेळची निवडणूक ही ऐतिहासिक राहिलेली आहे. या निवडणुकीने आपल्या समोर एक गोष्ट ठेवली आहे. ‘एक है, तो सेफ है’ हे या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केलं. मोदी है तो मुमकीन है हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालं, महाराष्ट्राच्या जनतेनं जे बहुमत दिलं आहे, त्याकरता मी जनतेला साष्टांग दंडवत घालतो,” असे फडणवीस म्हणाले. Devendra Fadnavis |
पुढे ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार मानतो. ज्या प्रक्रियेनं आपण निवडून येतो, त्या संविधानाची 75 वर्षं पूर्ण होतायत म्हणून हे महत्वाचं आहे. माझ्याकरता भारताचं संविधान सगळ्यात महत्वाचं आहे, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे.” Devendra Fadnavis |
🕧 दु. १२.२५ वा. | ४-१२-२०२४📍विधान भवन, मुंबई.
Live from Vidhan Bhavan Central Hall#Maharashtra #Mumbai https://t.co/h2TjJLDyLv
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 4, 2024
पंतप्रधान मोदींचे मानले आभार
“2019 साली जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता, दुर्दैवानं तो कौल हिसकावून घेत जनतेशी बेईमानी केली होती. सुरूवातीच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात आपल्या आमदांराना त्रास दिला गेला तरीही एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही. माननीय मोदीजींचे मी आभार मानतो, की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी बसवलं, एक वर्ष फक्त 72 तासांसाठीच होतो, पण टेक्निकली मुख्यमंत्रीपदी होतोच, त्यामुळे यंदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी बसवले,” असे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“आता जबाबदारी सुद्धा वाढली आहे. जबाबदारीची जाणीव करून देणारा जनादेश आहे. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके युवा, लाडके शेतकरी या सर्वांनी समाजातील दलित, वंचित, ओबीसी, आदिवासी या सर्वांनी दिलेल्या जनादेशाचा सन्मान राखण्याचं काम आपल्याला करावं लागेल. येत्या काळात आपली प्राथमिकता आपण सुरू केलेल्या योजना आणि दिलेली आश्वासनं पूर्ण करणं याकडे असेल,” असं फडणवीस म्हणाले.
शपथविधी ५ डिसेंबर रोजी
महायुती सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे.या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह केंद्रातील मंत्री आणि दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.





