“शिवसेना-भाजप युती तुटू नये, यासाठी फडणवीस ठाम होते”; संजय राऊतांचा खुलासा

Sanjay Raut on Devendra Fadnavis | भाजप-शिवसेना युती 2014 ला तुटण्यामागचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेना-भाजप युती तुटू नये, यासाठी देवेंद्र फडणवीस त्यावेळी आग्रही होते, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले.
नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “हिंदूहृदयसम्राट हे महान हृदयाचे नेते होते. त्यांनी सांगितलं होतं की, की मतांची विभागणी नको, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण एकत्र काम केले पाहिजे. बाबरी प्रकरणानंतर, अयोध्येच्या राम मंदिर आंदोलनानंतर आम्ही संपूर्ण देशात निवडणुका लढणार होतो. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची एक लाट देशात तयार झाली होती.
“लोकसभेला उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात अशा हिंदी भाषिक पट्ट्यात 60 ते 65 जागा लढायचे आमचे ठरले होते. या लाटेत आमच्या किमान 40 जागा निवडून आल्या असत्या, याची आम्हाला खात्री होती. आमची तयारी सुरु असतानाच आम्ही हे ज्यावेळी जाहीर केले, तेव्हा भाजपचे धाबे दणाणले. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचा बाळासाहेबांना फोन आला. त्यांनी सांगितले की, तुम्ही देशभरात निवडणुका लढत आहात, त्यामुळे भाजपचे नुकसान होऊ शकते. हिंदुत्ववादी मतं विखुरतील. त्यामुळे भाजप हरेल, काँग्रेसला फायदा होईल. मी तुम्हाला विनंती करतो, की तुम्ही तुमचे उमेदवार मागे घ्या. बाळासाहेब महान हृदयाचे माणूस होते. त्यांनी आम्हाला सांगितले, की राज्याबाहेरचे उमेदवार मागे घ्या. अटलजींचा फोन होता, आपण त्यांचा सन्मान राखला पाहिजे,” असे संजय राऊत यांनी सांगितले.
“2014 साली भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते युती तोडण्यासाठी दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते. त्याचं ठरलं होतं की युती तोडायची. चर्चेचा फक्त गुऱ्हाळ सुरू होता. बाळासाहेब ठाकरे हयात नव्हते याचा फायदा घ्यावा. शिवसेनेला आपण संपवावे हे त्यांचे धोरण होते. शिवसेनेच्या पोटनिवडणुकीच्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाला साक्षात्कार झाला की महाराष्ट्रात शिवसेना आपल्यासोबत असेल तरच देशात आणि राज्यात आपण सत्तेत येऊ शकतो, असे भाजपाला त्यावेळी वाटले होते.”
“2014 साली एका-एका जागेवर 72 तास चर्चा चालली होती. ओम माथुर त्यांचे प्रभारी होते. आम्ही त्यांचा सगळा खेळ पाहत होतो. पण मी एक नक्की सांगेन की, देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थिती शिवसेना-भाजप युती तुटू नये, या मताचे होते. तेव्हा युतीसंदर्भात त्यांची भूमिका सकारात्मक होती, तरीही भाजपचा वरुन कार्यक्रम आला, त्यानुसार युती तुटली, असे म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांचे समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा:
संसदेत ‘छावा’चे स्क्रीनिंग…! पंतप्रधान मोदींसह खासदार पाहणार चित्रपट





