छत्रपतींच्या नावाने चाललेले दळभद्री उद्योग फडणवीसांनी बंद पाडावेत; ठाकरे गटाची मागणी

मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांनी औरंगजेबाची कबर काढून टाकण्याचा इशारा दिला तसेच बाबरीची पुनरावृत्ती होईल असा गंभीर इशारा त्यांनी दिला होता. यापार्श्वभूमीवर सरकारने औरंगजेबच्या कबरीवर सुरक्षा वाढवली आहे. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत.
अशातच आता शिवसेनेच्या ठाकरे गटानेही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ठाकरे गटाने त्यांचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून यासंदर्भात भाष्य केले आहे. शिवाजी महाराज कोणाविरुद्ध लढले? मराठ्यांनी २५ वर्षे दुश्मनांना कसे झुंजवले? महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाव घालणाऱ्यांचे थडगे याच मातीत कसे बांधले जाते? हा इतिहास काही लोकांना पुसून टाकायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चाललेले हे दळभद्री उद्योग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद पाडायला हवेत, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
सामना मुखपत्रात नेमकं काय म्हटलंय?
काही नवहिंदुत्ववाद्यांची अशी गर्जना आहे की, ज्याप्रमाणे बाबरी पाडली त्याप्रमाणे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू. हे लोक इतिहासाचे व महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेचे शत्रू आहेत. त्यांना महाराष्ट्राचे वातावरण विषारी करायचे आहे व स्वतःला हिंदू-तालिबानी म्हणून मिरवायचे आहे. हिंदुत्वाचे विकृतीकरण घडवून शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचाही ते अपमान करीत आहेत. शिवाजी महाराज कोणाविरुद्ध लढले? मराठ्यांनी २५ वर्षे दुश्मनांना कसे झुंजवले? महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाव घालणाऱ्यांचे थडगे याच मातीत कसे बांधले जाते? हा इतिहास काही लोकांना पुसून टाकायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चाललेले हे दळभद्री उद्योग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद पाडायला हवेत, अशी मागणीही ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
कबर खोदून तुम्हाला काय मिळणार : विजय वडेट्टीवार
औरंगजेबाची कबर खोदण्याच्या आधी तुम्ही जी पापं केली आहेत त्याकडे पाहा. ४०० वर्षापूर्वीच्या कबरीवर राजकारण करणं आणि इतिहास मोडून तोडून सांगणे, सणांमध्ये एकमेकांमध्ये भांडणे लावून देणे यासारख्या गोष्टी आता सामान्य झाल्या आहेत. या लोकांना महाराष्ट्रातल्या जनतेला शांततेने जगू द्यायचे नाही. राज्य नेहमीच अस्थिर ठेवण्याचे काम केले जात आहे. औरंगजेब २७ वर्षे येथे होता तेव्हा तो महाराष्ट्राचे काहीही बिघडवू शकला नाही. आता त्याच्या मृत्यूनंतर त्याची कबर खोदून तुम्हाला काय मिळणार आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे : एकनाथ शिंदे
शिवभक्तांच्या भावनांचा आदर मी करतो, औरंगजेबान संभाजी महाराजांचा छळ केला. संभाजी महाराज यांचे शौर्य आणि औरंगजेबाचे क्रौर्य, त्या क्रौर्याची परिसीमा त्याने गाठली होती. त्यामुळे अशा औरंग्याची निशाणी किंवा आठवणी या महाराष्ट्रामध्ये कशाला पाहिजे? ही भावना शिवभक्तांची आहे, तीच माझी भावना आहे. क्रूरकर्मा औरंग्याचे कोणीही समर्थन करता कामा नये. तो महाराष्ट्राचा दुश्मन होता, देशद्रोही, राष्ट्रद्रोही होता, अशा या औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे. जे उदात्तीकरण करतात त्यांचा निषेध केला पाहिजे, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
औरंगजेबच्या कबरीवर सुरक्षा वाढवली
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांनी औरंगजेबाची कबर काढून टाकण्याचा, तसेच बाबरीची पुनरावृत्ती होईल असा गंभीर इशारा त्यांनी दिला होता. यापार्श्वभूमीवर सरकारने औरंगजेबच्या कबरीवर सुरक्षा वाढवली आहे. त्या ठिकाणी आता एसआरपीएफची तुकडी तैनात केली आहे. त्यात 15 पोलीस कर्मचारी असणार आहे. तसेच दोन पोलीस अधिकारी कबरीचे संरक्षण करणार आहे.





