बनावट नोटांच्या केसेस कमकुवत करण्यात फडणवीसांनी वानखेडेंची मदत घेतली : नवाब मलिकांचा गंभीर आरोप

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना मोठ्या पदावर बसवलं, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. सोबतच बनावट नोटांचा खेळ फडणवीसांच्या आशीर्वादानं सुरु होता. बनावट नोटांचं पाकिस्तानपर्यंत कनेक्शन आहे. जे खोट्या नोटांचं रॅकेट चालवत होते त्याला तत्कालिन फडणवीस सरकारचा पाठिंबा होता. आज सकाळी पत्रकार परिषद घेत मलिक यांनी फडणवीसांवर आरोप केले आहेत.
पत्रकार परिषदेत मलिक म्हणाले की, खोट्या नोटांच्या केसेसला कमकुवत करण्याचे काम समीर वानखेडेंनीच केले. खोट्या नोटाच्या केसचा इंचार्जही समीर वानखेडेच होते, असे ते म्हणाले. खोट्या नोटांच्या रॅकेटमधील इम्रान आलम शेख हा हाजी अराफत शेखचा लहान भाऊ आहे. हाजी अरफात शेख हा भाजपमध्ये पक्षप्रवेश करुन अल्पसंख्याक कमिशनचा अध्यक्ष आहे, असे मलिक म्हणाले.
तसेच बनावट पासपोर्ट प्रकरणी रियाज भाटीला पकडले होते. तो अद्यापही फरार आहे. सगळ्या शहराला माहितीय रियाज भाटी कोण आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात तो कसा जातो. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात जो जात त्याला संपूर्ण स्कॅनिंगनंतरच पास दिला जातो. पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा रियाझ भाटीचे पंतप्रधानांसोबतही फोटो आहेत. एखादा गुंड, क्रिमीनल सहजपणे पंतप्रधानांपर्यंत पोहोचतोच कसा असा सवाल मलिक यांनी केला आहे. रियाझ भाटी हा दाऊद इब्राहीमचा माणूस आहे. तो आज फरार आहे असेही मलिक म्हणाले.
नवाब मलिक म्हणाले की, मुन्ना यादव, हैदर आझम, रियाझ भाटी यांच्याशी कसे संबंध आहेत ते फडणवीसांनी सांगावं, असंही मलिक म्हणाले. केंद्राच्या एजन्सीला आमचं आवाहन आहे की खोट्या नोटांबाबत पुन्हा एकदा चौकशी व्हावी. नवाब मलिक म्हणाले की, हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादवला फडणवीसांनी बांधकाम कामगार मंडळावर अध्यक्ष केलं. हैदर आझम बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करतो, याच्या दुसऱ्या पत्नीवर खोट्या कागदपत्रांबाबत गुन्हा दाखल होत असतांना फडणवीस मुख्यमंत्री असांना त्यांच्या कार्यालयातून फोन गेला, असाही आरोप मलिकांनी केला.
नवाब मलिकांनी म्हटले की, 2005 साली मी मंत्रीपदावर नव्हतो. सलीम पटेलचा मृत्यू झालाय ही माहिती मला 5 महिन्यांपूर्वी मिळाली आहे. सलीम पटेलचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या बातम्यांवरुन सलीम पटेलनं त्यावेळी अनेक माध्यमांवर डिफमेशन दाखल केले होते, असे मलिक म्हणाले.
मलिकांनी यावेळी म्हटले की, जेव्हा नोटबंदी झाली त्यावेळी खोट्या नोटा पकडले जाण्याचं प्रमाण संपूर्ण देशभरात वाढलं होतं. मात्र महाराष्ट्रातून खोट्या नोटांचं एकही प्रकरण समोर आलं नाही. 8 ऑक्टोबर 2017 मध्ये इंटेलिजन्सकडून बीकेसीमध्ये छापेमारी झाली. ज्यात 14 कोटी 56 लाखांच्या खोट्या नोटा सापडल्या. या प्रकरणाला फडणवीसांकडून दाबलं जाण्याकरता प्रयत्न झाले, असं ते म्हणाले. मी जे आरोप फडणवीसांवर लावतोय याबाबत मी नक्कीच गृहविभागाला माहिती देईन, असेही ते म्हणाले.
अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर बोलताना ते म्हणाले की, मी महिलांच्या आरोपांवर उत्तर देणार नाही. काळ्या पैशांवरुन माझ्यावर आरोप लावले जातात. मग, 200 कोटींचे फ्लॅट बीकेसीत, वरळीत कोणाच्या नावावर आहे हे काढू का? असे ते म्हणाले.





