जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावर फडणवीसांचं एका शब्दात उत्तर: ‘नाही’

नवी मुंबई: राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात मोठे फेरबदल होत आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची नियुक्ती होणार आहे. या घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामांची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. जयंत पाटील यांना आणि नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना शुभेच्छा. सगळ्यांनी चांगलं काम करावं.” जयंत पाटील महायुतीत येत असल्याच्या प्रश्नावर फडणवीसांनी फक्त “नाही” असं उत्तर दिलं.
याचवेळी, फडणवीसांनी नवी मुंबई विमानतळाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, “विमानतळाची भौतिक प्रगती 94 टक्के पूर्ण झाली आहे. बॅगेज हाताळणी प्रणाली जगातील सर्वात वेगवान असेल. मेट्रो, रेल्वे, जलवाहतूक यांसारख्या सुविधांमुळे हे विमानतळ मुंबईपेक्षा मोठं आणि देशातील सर्वात आधुनिक असेल.” 30 सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





